Friday, January 2, 2009

का जातात पिल्ले घरटे सोडून?

मायेची कवले नकळत फोडून.

एका नसलेल्या दाण्यामागे पळत.

ह्या मनाला कधीच नाही कळत...

क्षितिजावरती भेटायचे वचन मोडून,

लाजत सूर्य पळतो रोज कडावरून.

का तरी धरणी असते विव्हळत?

ह्या मनाला कधीच नाही कळत...

का सुर्याला अस्त व्हायचे असते?

का सरीला लवकर जायचे असते?

का व्हायचे ते कधीच नाही टळत?

ह्या मनाला कधीच नाही कळत?

बघून तो सप्तरंगी चंद्राचा वेढा,

का होतो तो चकोर वेडा?

का हव असता ते नाही मिळत?

ह्या मनाला कधीच नाही कळत?